रायगडात जनावरांसाठी सीमाबंदी

लम्पी स्कीनचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी; जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

लम्पी स्कीन हा आजार झपाट्याने गायी, म्हशींमध्ये पसरु लागल्याने रायगड जिल्ह्यात पशुबाजार बंद, जनावरांच्या शर्यतींवर बंदी, तसेच जनावरांची वाहतूक करण्यास जिल्हांतर्गत बंदी घालण्यात आली असून, जिल्हह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अशी लागण झालेले एकही जनावर आढळून आलेले नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून बेमुदत काळासाठी ही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशु विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नाकर काळे यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, डॉ. राजेश लालगे, डॉ. कृतिका तरमाले यांच्यासाहित अधिकारी उपस्थित होते.

लम्पी स्कीन आजार हा विषाणूजन्य असून, तो गाय व म्हैस या प्राण्यांना जडत असल्याचे आढळून येत आहे. गोवर्गात अधिक प्रमाणात तर म्हैसमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते.

रायगड जिल्ह्यात लम्पि स्किन आजाराची मुरुड तालुक्यातील कोर्लई आणि बोर्ली येथे पाच संशयास्पद जनावरे आढळून आली होती. त्यांच्यावर योग्य ते उपचार व विलगीकरणकरण्यात आले असून, त्यांच्यापासून नवीन एकाही जनावराला लागण झालेली नाही. ती जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. तसेच त्या जनावरांमध्ये रक्त नमुने हे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तेथून ते नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय पशु संशोधन केंद्र येथे पाठविण्यात आले होते. त्याचे निकाल आले असून, ते नकारात्मक आहेत, असेही डॉ. काळे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात 2,39,000 गोवर्गीय पशुधन आहे. गायीला या रोगाचा संसर्ग जलदगतीने होतो तर म्हैसला कमी प्रमाणात होतो. रायगड जिल्ह्यात एकशे बावीस पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात लम्पि स्किन आजाराचा रुग्ण आढळून आल्यास योग्य तो औषध उपचार करणे, बाधित जनावराचे विलगिकरण करणे व संसर्ग होण्यापासून नियंत्रण करणे व पाच किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकारात लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नाकर काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारेच्या माध्यमातून दिल्या आहेत.

प्रशासन सज्ज
रायगड जिल्ह्यात सर्व पशुवैद्यकीय संस्थेमध्ये लम्पि स्किन आजारावर उपचार करण्यासाठी दहा हजार लस मात्रा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पशुपालकांना अशा आजाराचा संशय आल्यास 1962 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग रायगडकडून करण्यात आले आहे. लम्पि स्किन आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

असा होतोय प्रसार
या रोगाचा प्रसार प्रसार मुख्यत्वे चावणार्‍या माशा (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते 1-2 आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली आहे.

Exit mobile version