| पनवेल | वार्ताहर |
पावसाळा सुरू झाला की रानमेव्याने बाजापेठा फुलून जातात. कुर्डू, टाकळा, शेवळे, भारंग, तेलपाट, ससेकांद अशा पाहुणेमंडळींनी सध्या भाजीमार्केट फुलून गेला आहे. फक्त पावसाच्या पाण्यावर फुलणारा अत्यंत सकस आणि पौष्टीक असा रानमेवा पनवेलमध्ये दाखल झाला आहे.
ऐन पावसाळ्यात येणाऱ्या या करंदा, अळू, हिरवे बिरडे, आळंबी, कुड्याच्या शेंगा, कुवली, बांबूचे कोंब यांची आवक बाजारात वाढली आहे. कोणत्याही रासायनिक खता-औषधांशीवाय जंगलात रूजत असल्यामुळे हा रानमेवा खूपच चविष्ठ आणि तितकाच पौष्टीक असतो. पनवेल तालुक्यामधील बाजारात काही प्रमाणात रानभाज्या विक्रीसाठी यायला सुरुवात झाली आहे. या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने व रासायनिक विद्राव्यापासून मुक्त असणाऱ्या या रानभाज्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पावसाळा सुरू झाला की, पनवेल तालुक्यात आदिवासी भागातील डोंगरकपारी व घनदाट जंगलात राहणारा आदिवासी समाज आपल्या परिसरातील निरनिराळ्या रानभाज्या विक्रीसाठी शहरी भागात व तालुक्याच्या ठिकाणी घेऊन येत असतो. पनवेल तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची बरसात झाली असून रानावनात झाडाझुडपांना, वेलींना पालवी फुटू लागली आहे. अशा वातावरणात बाजारात रानभाज्यांची आवक वाढली असून औषधोपयोगी म्हणून ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.