वसुलीच्या तगादाने 100 कोटींचे प्रकल्प रोखले
| रायगड | आविष्कार देसाई |
कर्जाच्या बोजाखाली दबलेले असतानाही नितीन देसाई यांनी सुरु असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले होते. परंतु कंपनीकडून वसुलीसाठी सातत्याने तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे सुरु असलेले प्रकल्पाचे काम बंद पडले, तर नवीन प्रकल्प येण्याचेही दरवाजे बंद झाल्याने तब्बल 100 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान नितीन देसाई यांना सोसावे लागले. असा सणसनाटी आरोप देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून पुढे आला आहे.
यामध्ये कंपनीचे अधिकारी आणि नेमलेल्या प्रशासकामुळेच एवढा मोठा आर्थिक फटका देसाई यांना बसला. घेतलेले कर्ज परत फेडू नये यासाठीच संबधित वित्तीय कंपनी प्रयत्न करत होती. सदरचे कर्ज फेडले नाही तर, एनडी स्टुडिओचा ताबा संबंधित वित्तीय संस्थेकडे जाणार होता. ही जागा गिळंकृत करुन त्यांना या ठिकाणी खासगी व व्यावसायिक बांधकाम करायचा कुटील डाव होता. त्यामुळे त्याचा मानसिक ताण नितीन देसाई यांच्यावर आला असे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
स्टुडिओतील जमिनींवर डोळा
एखाद्या कलाकाराचे कौशल्य हे त्याची कला असते. त्या कौशल्याच्याच जोरावर नितीन देसाई यांनी कर्ज घेतले होते. त्यांना आत्मविश्वास होता की सदरचे कर्ज आपण फेडू शकतो. मात्र कर्ज फेडता येऊ नये यासाठी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचे नेहा यांनी दिलेल्या तक्रारीतून दिसून येते. देसाई यांनी एनडी स्टुडिओमधील जमीन तारण ठेवली होती. त्याची किंमत निश्चितच कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक असणार. सदरची जमीन मुंबई-पुणे महामार्गावर होती. जमीन ही दर्शनी भागावरती असल्याने अशा जमिनींवर उद्योजकांचा डोळा असणारच. ही जमीन अशा उद्योजकांच्या घशात घालण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याने देसाई हे व्यथित झाले होते. कर्ज देणाऱ्या कंपनीने हेच हेरुन देसाई यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे आता लपलेले नाही.
महाराणा प्रताप या वेबसीरीजचे काम देसाई यांना मिळाले होते. तसेच त्यांची अन्य कामे मिळवण्यासाठी धडपड सुरुच असणार परंतु देसाई यांची अडवणूक झाल्याचे त्यांच्या पत्नी नेहा यांनी तक्रारीत नमुद केले आहे. सुरु असलेले प्रकल्प बंद पडणे आणि नवीन प्रकल्प न आल्याने सुमारे 100 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान देसाई यांना झाले आहे.
नेहा नितीन देसाई
दरम्यान, प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना रायगड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. विविध मद्द्यांवर संचालकांकडून माहिती मागवण्यात आली आहे. 8 ऑगस्टला सकाळी दहा वाजेपर्यंत खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती सादर करण्याचे फर्मान पोलिसांनी दिले आहे.