| रायगड | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील वावे-उसरोली येथील शेतकऱ्याला बैलगाडी शर्यतीमध्ये पळणारा बैल देण्याचे सांगून सांगलीमधील आसंगी येथील दोघांनी फसवणूक केली. तसेच शर्यतीत न पळणारा बैल दिला. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे शर्यतीसाठी खरेदी केलेला बैल परत नेण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांना बोलावले. त्या दोघांनी शेतकऱ्याला दिलेला बैल नेला. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वरसोली येथे 7 मार्च 2023 रोजी शरद खेडेकर (रा.मु वावे पो. उसरोली ता. मुरुड) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आसंगी येथील हर्षद पाटील आणि ऋषिकेश पाटील यांच्याकडुन 1 लाख 38 हजार रुपयाला शर्यतीत पळणारा बैल खरेदी केला. खरेदी केलेला बैल शर्यतीत पळाला नाही तर तो बैल तुम्हाला परत घ्यावा लागेल व पैसे परत द्यावे लागतील अशी अट शरद खेडेकर यांनी पाटील बंधूना घातली होती.
या अटीवर खरेदी केलेला बैल पळत नसल्याचे शरद खेडेकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हर्षद पाटील आणि ऋषिकेश पाटील यांना फोन करुन बैल पळत नसल्याचे सांगितले. यावर हर्षद आणि ऋषिकेश यांनी शरद खेडेकर यांना तो बैल परत नेतो व दुसरा बैल आणुन देतो असे सांगितले. हर्षद आणि ऋषिकेश 14 मार्च 2023 रोजी सायंकाळी सात वाजता वरसोली येथुन शर्यतीत न पळणारा पहिला बैल घेवुन गेले.
या घटनेनंतर तब्बल पाच महिने उलटले तरी हर्षद आणि ऋषिकेश यांनी दुसरा बैल किंवा 1 लाख 38 हजार रुपये परत दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेडेकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे करीत आहेत.