| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये दमदार कामगिरी करण्याच्या आशांना शुक्रवारी सुरुंग लागला आहे. भारताची महिला बॉक्सर परवीन हुडा हिला जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेकडून (वाडा) 22 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे आता 57 किलो वजनी गटासाठी भारतीय बॉक्सिंग संघटनेला इतर खेळाडूची निवड करून तिला पात्रता फेरीत खेळवावे लागणार आहे.
परवीन हुडा हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक पटकावत भारतासाठी पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला होता, पण एप्रिल 2022 ते मार्च 2023 या दरम्यान 120 महिन्यांच्या कालावधीत परवीन हिच्याकडून वाडाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तीन वेळा ठावठिकाण्याची निश्चित माहिती न दिल्यामुळे 22 महिन्यांसाठी तिला निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या शिक्षेपैकी 14 महिन्यांची शिक्षा अद्याप बाकी आहेत. त्यामुळे तिला पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येणार नाही.
येत्या 24 मे पासून अखेरच्या ऑलिंपिक पात्रता फेरीला बँकॉक येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघटनेकडून आता 57 किलो वजनी गटासाठी इतर खेळाडूंचा पर्याय शोधावा लागणार आहे. 11 एप्रिलपर्यंत नोंदणी असलेल्या खेळाडूंनाच याप्रसंगी संधी मिळणार आहे. याचा अर्थ हा कोटा गमावण्याची आपत्ती भारतावर ओढवू शकणार आहे. सध्या निखत झरीन, प्रीती व लवलीना बोर्गोहेन या तीनच खेळाडूंनी भारतासाठी ऑलिंपिक कोटा मिळवलेला आहे.