| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) बैठक 11 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि जे. एस. खेहर, माजी खासदार व कायदेतज्ज्ञ डॉ. ई. एम. नचिअप्पन, माजी कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह कायदा क्षेत्रातील मान्यवरांची मते यावेळी जाणून घेतली जाणार आहेत. एकत्रित निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने गेल्यावर्षी संसदेत 129 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतले होते.
त्यानंतर या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि जनतेची मते जाणून घेण्यासाठी भाजपचे नेते पी. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसीची स्थापना करण्यात आली होती. जेपीसीच्या सदस्यांनी महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना आदी राज्यांचे दौरे करत बैठका घेतल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संघटना आणि अन्य भागधारक या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सूचना समितीपर्यंत पोहोचवू शकतील. लोकांना त्यांच्या भाषेत सल्ले देता यावेत, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे चौधरी यांनी नमूद केले. साधारणपणे 39 सदस्यांच्या जेपीसीमध्ये लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 सदस्य आहेत. सदस्य असलेल्या प्रमुख खासदारांमध्ये भाजपचे नेते अनुराग ठाकूर, बांसुरी स्वराज, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी- वद्रा यांचाही समावेश आहे.






