पावसाळी पर्यटनाला ब्रेक; हंगामी अर्थव्यवस्थेला नियमांचा फटका

पावसाळी पर्यटन व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर

| अलिबाग | प्रतिनिधी |

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पावसाळी पर्यटनाचे पर्यटकांना वेध लागले आहे. सतत सुरु असलेल्या पावसांमुळे धरणे, धबधबे, तलावांमध्ये पाणी भरले आहे. परंतू खालापूर, कर्जत, महाड व माणगाव या तालुक्यातील पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आले आहे. पावसाळी पर्यटनावर अवलंबून असणारे हंगामी अर्थव्यवस्थेला नियमांचा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी पर्यटकांना अनेक पर्यटन स्थळे खुणावत असतात. निसर्गरम्य ठिकाणाचा वारसा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील तिनविरा धरण, कोंडीचा धबधबा, फणसाड, खारआंबोली धरण, पाषाणे तलाव, शिवथरघळ, पांडवकडा. आडोशी धबधबा, मोरबे धरण, आडोशी पाझर तलाव, झेनिथ धबधबा अशा अनेक धरणे, धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी होते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या धबधबे, धरणांमध्ये पावसाळ्यात मौजमजा करण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात पर्यटक लुटतात.

गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनाचा ओघ प्रचंड वाढू लागला आहे. पावसाळ्यात वाढत्या पर्यटकांमुळे या भागातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळते. पर्यटनावर अधारित असलेले हॉटेल, कॉटेजेस, वडापाव, पॅटीस, चहावाले, ट्रेकिंग आदी व्यवसायिकांना आर्थिक फायदा होतो. या हंगामात पर्यटन स्थळांना सुमारे तीन लाख पर्यटक भेटी देतात. या व्यवसायातून सुमारे सहा कोटीची उलाढाल होते. या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार, काच, प्लास्टीक बाटली विक्री करणारे भंगारवाले या सर्वांना यातून रोजगार मिळतो. अनेक गावांतील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन या पर्यटनातून मिळते. पावसाळ्यात वाढत्या पर्यटनामुळे घरगुती भोजनाला अधिक पसंती दर्शविली जात आहे. तलाव, नदीतील मासळीवर पर्यटक मनमुरादपणे ताव मारतात. परंतू या हंगामी पर्यटन स्थळांवर काही पर्यटक मद्यधुंद होण्याचे प्रकार वाढत आहेत. महिला सुरक्षेबरोबरच अतिउत्साहीपणामुळे जीव जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. पर्यटन स्थळांचा आनंद लुटत असताना, काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करूनही दुर्लक्ष होत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने खालापूर, महाड, माणगाव व कर्जत तालुक्यातील धरणे व धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी काढले आहेत. अति उत्साहीपणामुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी जिल्ह्यात पावसाळी पर्यटनावर बंदी लागू केली आहे. या बंदीमुळे कोट्यावधीचा फटका पर्यटन व्यवसायावर बसणार आहे. या पावसाळी पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले लहान मोठ्या व्यवसायिकांनादेखील त्याची झळ पोहचणार आहे.

पावसाळी पर्यटन स्थळ
माणगाव – ताम्हाणी घाट,
पोलादपूर – शिवथरघळ,
महाड – रायगड.
कर्जत – पळसदरी धरण, पाली -भूतिवली धरण, सोलनपाडा धरण- पाझर
तलाव,कोंढाणे,धरण – धबधबा, पाषाणे तलाव,
नेरळ- जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा
खालापूर – धामणी कातकरवाडी धरण, कलोते धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, वावर्ले धरण, नढाळ धरण, आडोशी धबधबा, मोरबे धरण,आडोशी पाझर तलाव, झेनिथ धबधबा.

कर्जत, महाड, माणगाव व खालापूर तालुक्यातील पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये. तसेच जिवीतहानी रोखण्यासाठी हा निर्णय त्यात्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

सागर पाठक ,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड
Exit mobile version