। मुंबई । प्रतिनिधी ।
संपूर्ण जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला ठेवण्यात आल्याने या दिवशी शिंदे-ठाकरे यांचा ब्रेकअप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी सुरु झाल्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला.
मागच्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावे, अशी विनंती केल्याची आठवण सिब्बल यांनी करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचे मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे म्हटले आहे.