लाचखोर उपकोषागार अधिकारी जाळ्यात

सहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले


| माणगाव | प्रतिनिधी |


माणगावात सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास त्याला उपकोषागार कार्यालयातून ताब्यात घेतले.

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक मारुती रामचंद्र पवार (56) याने फिर्यादी यांच्या मुख्य कोषागार कार्यालय, महर्षी कर्वे मार्ग, दुसरा मजला, मुंबई येथून मंजूर झालेली सुधारित आश्वासित प्रगती योजनेनुसार ग्रॅजूटीचा फरक 45 हजार रुपये बँकेत जमा करण्याची मंजुरी देण्यासाठी गुरुवार, दि. 14 सप्टेंबर रोजी पडताळणीदरम्यान पंचासमक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये सहा हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1.55 वाजता फिर्यादीकडून उपकोषागार कार्यालय माणगाव येथे पंच साक्षीदारासमक्ष आरोपी मारुती पवार यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबागच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत केली. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी हे करीत आहेत.

Exit mobile version