उरण-पनवेल मार्गावरील पूलाची दुरुस्ती होणार; सिडकोच्या अधिकार्‍यांचे आश्‍वासन

। चिरनेर । वार्ताहर ।
उरण-पनवेल महामार्गावरील फुंडे स्टॉप जवळील पूल तातडीने दुरुस्त करावा या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने सिडकोच्या द्रोणागिरी नोडच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या शिष्टमंडळाला सिडकोच्या अधिकार्‍यांनी पुलाची दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
मोर्चाच्या शिष्टमंडळाने सिडकोचे कार्यकारी अभियंता एम.एम.मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पुलाच्या उभारणीत सीआरझेड, खारफुटी व पर्यावरणवादी यांचा अडथळा असून पर्यावरण विभागाच्या परवानग्या घेण्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळाने पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली. यावेळी सिडकोच्या अधिकार्‍यांनी कमकुवत पुलाचे पुन्हा एकदा परीक्षण करून त्याची दुरुस्ती कशाप्रकारे करता येईल ते पहिले जाईल, सिडकोच्या माध्यतून पुलाच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य असल्याचे मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी जेएनपीटीचे कामगार विश्‍वस्त कॉम्रेड भूषण पाटील, किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील, फुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर घरत, माजी सरपंच ज्योती म्हात्रे, डीवायएफआयचे राकेश म्हात्रे, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत हे उपस्थित होते.

Exit mobile version