अपघाताची शक्यता; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील वरसगाव ते भिरा मार्गावरील दुरटोली गावाकडे जाणार्या रस्त्यावरील छोट्या पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या पुलाला संरक्षण कठडे बसविण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
या मार्गावरून दुरटोली, गौळवाडी (विजयनगर), कामथ या गावांकडे जाण्यासाठी येथील रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या रस्त्यावरील असणार्या छोट्या पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या मार्गांवरून टूव्हीलर, रिक्षा, मिनिडोअर, फोरव्हिलर गाड्या ये-जा करीत असतात. अगोदच हा रस्ता अरुंद असल्यामुळे या पुलावर दोन्ही बाजूकडील दोन वाहने एकत्रित आली असता गाडी बाजूला घेण्याच्या नादात या पुलाला संरक्षण कठडे नसल्यामुळे वाहन पुलावरून खाली जाऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोणताही अपघात घडण्याच्या अगोदर दुरटोली रस्त्यावर असणार्या पुलाला संरक्षण कठडे बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.