सांगलीच्या श्रेयाची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावलं विजेतेपद


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे दि. 4 ते 10 डिसेंबरदरम्यान झालेल्या 36 व्या तेरा वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीच्या श्रेया हिप्परगीने निर्विवाद यश संपादित करत विजेतेपद पटकावले.

श्रेया गुराप्पा हिप्परगी ही मूळची सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून, या आधीही तिने थायलंड, स्पेन, जॉर्जिया व इंडोनेशिया या देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून आपल्या देशाची मान उंचावली आहे. ती सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या जत तालुक्यातील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला संख (ता. जत) या शाळेची विद्यार्थिनी आहे.
या स्पर्धेत श्रेयाने तेलंगणाची लक्षण्या बारला, श्रीदर्शनी, कृतिका, गोव्याची शेकविरा जनिका, तमिळनाडूची संमती श्री, महाराष्ट्राची निहिरा कौल, केरळाची व या टूर्नामेंटची टॉप सीड असलेली कल्याणी सिरीन, ओडीसाची प्रत्याशा जीना व आंध्र प्रदेशची आमुक्ता गुंताका यांच्यावर मात करत अकरापैकी साडेनऊ गुण मिळवून विजेतेपद पटकावले.

या कामगिरीमुळे तिची आशियाई, जागतिक, वेस्टर्न एशियन व कॉमनवेल्थ या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रा चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, सांगली जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चितळे, उपाध्यक्ष कोटी भास्कर, सचिव चंद्रकांत वळवडे, वायचळ, श्रेयाचे कोच अनुप देशमुख व सुमुख गायकवाड, निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संखचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक यांनी श्रेयाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version