। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या साई दीपक बलकवडे या खेळाडूने द्वितीय क्रमांक पटकाविला. नऊ राज्यांतील 461 स्पर्धकांसह परदेशी स्पर्धकही स्पर्धेत सहभागी झाले होते. साई हा आरसीएफ शाळेचा विद्यार्थी असून, मार्च 2022 ला दहावीची परीक्षा दिली आहे. 2000 रेटिंग खालील गटातील पहिली पुना ओपन बुद्धिबळ स्पर्धा, बॉक्सिंग हॉल, बालेवाडी पुणे येथे घेण्यात आली होती. स्पर्धा नऊ फेर्यांमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत आपले आंतरराष्ट्रीय मानांकन वाढविण्यासाठी आणि भरघोस असलेली बक्षिसे मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच पहिल्या फेरीपासून चालू होती. एकूण बक्षिसांची रक्कम दहा लाख या गटासाठी असल्याने अतिशय अटीतटीचे वातावरण होते. रायगड जिल्ह्यातील अलिबागचा साई बलकवडे हा पहिल्या सात फेर्यांमध्ये सातपैकी सात मिळवून पहिल्या टेबलवर खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. एकूण झालेल्या नऊ फेर्यांत 7.5 गुण मिळवून दुसरा आला. त्याला 85,000 रोख रुपये, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
याआधी त्याचे मानांकन 1581 होते. या स्पर्धेत त्याच्या मानांकनात 142 गुणांनी वाढ होऊन 1 जुलैला साईचे मानांकन 1723 होईल. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे आणि सर्व पदाधिकारी तसेच बुद्धिबळ क्रीडा खेळाडू आणि पालक वर्ग यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, त्याचे कौतुक होत आहे. बक्षीस समारंभाप्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, उद्योगपती श्रीकांत बिडवे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फूके आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, मुख्य आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिधोरे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते पार पडला.