सव्वा सहा लाखाचा ऐवज लंपास करणार्या चोरांना मुद्देमालासह अटक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गणेश उत्सवानिमित्त गावाला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्यावेळी तब्बल सव्वा सहा लाखाचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली होती. नेरळ पोलिसांनी चार दिवसात आरोपींना ताब्यात घेतले. तसेच चोरी झालेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही चोरी करणार्या एका तरुणाला अटक केली असून अन्य दोन तरुण हे विधी संघर्षित बालके आहेत.
नेरळ गावातील सम्राटनगर भागातील साईधाम सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणारे मोईनुद्दिन तय्यबअली मोमीन आणि त्यांचे कुटुंब गणेश उत्सवाची सुट्टी असल्याने आपल्या गावी बार्शी सोलापूर येथे गेले होते. मोमीन दाम्पत्य कळंब येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेवर शिक्षक असून त्यांचे घर बंद करुन कुटूंबियांसह बार्शी, सोलापूर येथे गेले होते. साईधाम इमारतीमधील त्यांच्या शेजारी राहणार्यांनी मोमीन यांना फोन करुन त्यांच्या रुमच्या दरवाजाची कडी तोडलेली आहे, तसेच बेडरुममधील कपाट उघडे असून सामन अस्ताव्यस्त पडलेले आहे, अशी माहिती दिली. प्रथमदर्शनी घरात चोरी झाल्याचे फिर्यादी माईनुद्दिन मोमीन यांना कळविले. त्याप्रमाणे मोमीन हे 11 सप्टेंबर रोजी आपल्या घरी आले आणि त्यानंतर घराची पाहणी करून चोरी झाली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दिली.
फिर्यादी यांचे सोन्याचे सुमारे 8 तोळे व चांदीचे 180 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम 85,000 चोरीला गेली आहे. चोरीस गेलेले दागिने, लहानसहान वस्तू, नेमकी रोख रक्कम किती याची खात्री करुन पोलीस ठाण्यात चोरीबाबत तकार दिली. सदर गुन्ह्याचे तपासकामी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी धूळदेव टेळे यांच्या मार्गदर्शन घेवून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपास दिली. पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांना समक्ष सुचना आणि मार्गदर्शन केले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार बेंद्रे आणि वांगणेकर यांनी घटनास्थळावरील येण्याजाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज पाहिले असता रात्रीच्या वेळी हातात लोखंडी कटावणी घेवून तरुण जात असल्याचे दिसले.
त्यानंतर पुढील धागेदोरे चोरट्यांचे नाव निष्पन्न करून धामोते आदिवासी वाडीमधील संजय नारायण दळवी आणि अन्य दोन विधि संघर्षित बालके यांना ताब्यात घेतले. दोन विधीसंघर्षित बालक आणि संजय नारायण दळवी या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. त्यांच्याकडून 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 180 ग्रॅम वजानी चांदीचे दागिने व रोख रक्कम 85,000 असा एकुण 6,22,500 रू पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीत संजय नारायण दळवी यास कर्जत न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून नेरळ पोलिसांच्या या कामगिरी बद्दल आणि मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतल्याबद्दल कौतुक होत आहे.