ऑनलाईन काम करणाऱ्यांना अनेक समस्या
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील बीएसएनएल मोबाईल नेटवर्कची सेवा गेले आठ दिवसांपासून ठप्प झाल्याने ग्राहक अक्षरक्ष हैराण झाले असून कोण वायफाय देता का वायफाय?, अशी विचारणा ग्राहकांकडून होत आहे. मुरुड हरिजन वाडा जवळील बीएसएनएलचे कार्यालय असून यांच कार्यालयामधुन बीएसएनएलची सेवा दिली जाते. मोबाईल नेटवर्ककरिता दत्तमंदिराजवळ बीएसएनएलचे टॉवर आहे. या टॉवरवरुन मुरुडच्या मोबाईलधारकांना या रेंजचा फायदा होत असतो. परंतु हा टावर गेले आठ दिवसांपासून नेटवर्क डाटा सेवा ठप्प झाल्याने मोबाईल नेटवर्क सेवा पुर्णतः बंद पडली आहे. शहरात मोबाईल नेटवर्ककरिता अनेक खासगी कंपन्यांचा नेटवर्क फुल असून ते चांगली सेवा देत आहे. परंतु बीएसएनएलची मोबाईल नेटवर्क सेवा कधीही ठप्प होते. हे आता दररोजचे झाले आहे. गेले आठ दिवस नेटवर्क डाटा अभावी गावातील व शहरातील विद्यार्थी, नोकरदार, वृत्तपत्र वाचक, पत्रकारांना ऑनलाईन काम करण्याची गैरसोय होत आहे. कामाकरिता कोणी वायफाय देता का वायफाय?, सध्या बीएसएनएलची धारकांची ही परिस्थिती आहे.
आमच्या प्रतिनिधी बीएसएनएलच्या अधिकारी प्रमोद पाटील यांना मोबाईल नेटवर्क डाटा चालत नसल्यामुळे ऑनलाईन प्रक्रियाला अडथळा येत आहे. या संदर्भात फोनद्वारे तक्रार केली. परंतु आज आठ दिवस झाले तरी अधिकाऱ्यांकडून या समस्येबाबत गांभीर्याने घेताना दिसत नाही. रेंज आज होईल उद्या होईल हेच उत्तर मिळत आहे. परंतू नेटवर्कचा डाटा मिळत नाही. मोबाईल नेटवर्क सुरळीत होताना दिसत नाही. ग्राहक अक्षरशः हैराण झाला आहे.






