| नेरळ | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत पोलीस कारवाई व्हावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासाठी कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनतेने बुधवारी ( 21 सप्टेंबर) कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. दोन हजारहून अधिकजण या मोर्चात सहभागी झाले होते.
कर्जत तहसील कार्यालय येथे मोर्चासमोर राहुल डाळींबकर,कैलास मोरे, धर्मानंद गायकवाड़ आणि धमेंद्र मोरे यांची भाषणे झाली.यावेळी पदाधिकारी यांनी रायगड जिल्हा परिषद तसेच कर्जत पंचायत समितीमध्ये हक्काची जाग अनुसूचित जातीसाठी राखीव असावी अशी मागणी केली .तर आंबेडकर यांच्यावरील केलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर टाकणार्या आणि शेअर करणार्या 15 जणांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.याबाबतचे निवेदन तहसीलदार शीतल रसाळ यांना देण्यात आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे हे उपस्थिती होत.मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.