कत्तलीसाठी नेणाऱ्या म्हशींची सुटका

80 म्हशींचा समावेश, चार टेम्पो जप्त; खालापूर पोलिसांची धडक कारवाई

| रसायनी | प्रतिनिधी |

कोल्हापूर येथून चार टेम्पोंमधून 80 म्हशी मुंबई येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खबर खालापूर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ खालापूर टोलनाक्यावर हे चार टेम्पो पकडले.

ईद सण जवळ आला असून, ईद साजरी करण्यासाठी जातीय सलोखा व पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना शुक्रवारी मुंबई देवनार येथे कत्तलीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणांगले येथील वडगाव बाजारातून चार टेम्पोंमधून 80 म्हशी जात असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ खालापूर टोलनाक्यावर बंदोबस्त तैनात केला असता टेम्पो (क्रमांक एमएच 02 एफजी 5162), टेम्पो (क्रमांक एमएच 47 बीएल 5451), टेम्पो क्रमांक (एमएच 03 सीपी 2327) व टेम्पो क्रमांक (एमएच 03 ईजी 5947) या चार टेम्पोत 80 म्हशी आढळल्या. चारही टेम्पोंचा आरटीओ व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडील कोणताही वाहतूक परवाना नाही. प्रत्येक टेम्पोमध्ये 20 म्हशी याप्रमाणे भरून या म्हशींना हवा, पाणी, चारा यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. अत्यंत दाटीवाटीने म्हशी भरल्याचे दिसून येत होते. त्यामुळे करीम कलीम कुरेशी, (28), रा. गोवंडी, शिवाजीनगर, लोटस कॉलनी मुंबई, हिदायत शहदाय अब्बास सय्यद, (48), रा. गोवंडी मुंबई, फरान आस्लम आलवी, (30), रा. गोवंडी, शिवाजीनगर लोटस कॉलनी मुंबई, रेहान आस्लम आलवी, (24), रा. गोवंडी मुंबई, प्रताप भिका चव्हाण, (60), रा. गोवंडी टाटानगर, बबन बाळाराम कांबळे, (60), रा. सावरडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, रमजान छेटू खान, (51), रा. टाटानगर गोवंडी मुंबई यांच्याविरूद्ध पोलीस हवालदार चंद्रकांत पेर यांनी कायदेशीर तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Exit mobile version