जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचे बिगूल

जिप, पंचायत समिती प्रभाग रचना प्रसिद्ध
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद व 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 चे बिगूल वाजू लागले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन देखील तयारील लागले असून निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत प्रभाग रचना प्रस्ताव तयार करुन प्रसिद्धी देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदरची अधिसुचना रायगड जिल्हा परिषद आणित तालुक्यतील सर्व पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर 2 जुन रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्‍चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नवीन प्रभागरचनेनुसार रायगड जिल्हा परिषदेमध्ये नव्याने 7 गट व 14 पंचायत समिती गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी एकूण 66 सदस्य होणार असून पंचायत समित्यांमध्ये 132 सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

मार्च 2022 मध्ये मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्यानिहाय जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याचा आराखडा जिल्हाधिकार्‍यांकडून आयोगाला सादर केल्यानंतर यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा हा 2011 च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा.आयुक्तांनी यावर मुदतीमध्ये मान्यता द्यावी. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी यावर हरकती सूचना मागवाव्यात. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी घ्यावी. सुनावणीनंतर आयुक्तांनी प्रभाग रचनेस अंतिम मान्यता द्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

आरक्षण सोडत नंतर होणार जाहीर
प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर पनवेल तालुक्यातील 9 गट व 18 गण, कर्जत तालुक्यातील 6 गट व 12 गण, खालापूर तालुक्यातील 5 गट व 10 गण, सुधागड तालुक्यातील 2 गट व 4 गण, पेण तालुक्यातील 6 गट व 12 गण, उरण तालुक्यातील 5 गट व 10 गण, अलिबाग तालुक्यातील 8 गट व 17 गण, मुरुड तालुक्यातील 2 गट व 4 गण, रोहा तालुक्यातील 5 गट व 10 गण, तळा तालुक्यातील 2 गट व 4 गण, माणगाव तालुक्यातील 5 गट व 10, म्हसळा तालुक्यताील 2 गट व 4 गण, श्रीवर्धन तालुक्यतील 2 गट व 4 गण, महाड तालुक्यातील 5 गट व 10 गण तर पोलादपूर तालुक्यातील 2 गट आणि 4 गणांसाठी धूमशान होणार असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांत गट व गणांची संख्या वाढली आहे. या गट व गणांच्या अधिकृत निश्‍चितीनंतर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आता 66 होणार आहे. पूर्वी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 59 होती. त्यामध्ये पनवेल, खालापूर, पेण, उरण, अलिबाग, रोहा, माणगाव अशा 7 गटांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील वाढली आहे.

Exit mobile version