| पनवेल | प्रतिनिधी |
पावसाळा कागदोपत्री संपला असला तरी ऑक्टोबर महिन्यातही पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर तलाव, धरण आणि नद्या तुडुंब भरल्या असून, जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तरीदेखील करंजाडे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भीषण झाली आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नागरिकांना बैलगाडीचा आधार घेत पाणी विकत आणावे लागत आहे. त्यांना दोनशे लीटरच्या पाण्याच्या पिंपासाठी तब्बल चारशे रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. आता नुकताच हिवाळा सुरु झाला असून, पुढील दहा महिन्यांत पाणी उपलब्धतेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल, अशी भीती करंजाडे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या समस्येला संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पाण्याच्या नियोजनाअभावी येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या टंचाईकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.







