| चिपळूण | वार्ताहर |
कोकण रेल्वेमध्ये स्लीपर कोचचे तिकीट काढल्यावर प्रवासी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत झोपू शकतात, असा रेल्वेचा नियम आहे. परंतु, स्लीपर कोचचे तिकीट आम्ही झोपून जाण्यासाठीच काढले आहे, असे तिकीटधारी प्रवासी दादागिरीने इतर प्रवाशांना सांगत असतात. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातून वादावादी होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
स्लीपर कोचमध्ये एका बाजुला तीन सीट नंबर असतात. ते रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी तीन प्रवाशांना तीन स्लीपर व त्यातील तीन प्रवाशांना दिवसा बसण्यासाठी एकच लोअर स्लीपर वापरायचा असतो, असा रेल्वेचा नियम आहे. विशेष म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येकाला आपली सीट झोपण्यासाठी वापरता येते. परंतु, आरक्षण केलेली व्यक्ती दिवसा सुद्धा तिचा वापर झोपण्यासाठी करते. त्यामुळे दिवसा मधली सीट झोपण्यासाठी ठेवल्याने खालच्या सीटवर बसणाऱ्या माणसाला खाली मान घालून बसावे लागते. शिवाय जेवण सुद्धा खाली मान घालून करावे लागते. रेल्वेमधील टि. सी. देखील त्यांना काही सांगत नाहीत. सध्या प्रवास करताना प्रवाशांमध्ये भांडण होत आहेत. काही प्रवासी चुकीचे वागत असतील तर टि.सी.ने त्यांच्यावर कार्यवाही करावी. जास्त दादागिरी कोकणाच्या बाहेरचे प्रवासी करीत असल्याचे निर्देशनास आले आहे. तरी रेल्वे प्रशासनाने ताबडतोब यामध्ये लक्ष घालून कोकणातील होणाऱ्या प्रवाशांवरचा अन्याय दुर करावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.