| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांत कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (दि.23) विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून, त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी चेतना नितील यांनी या बैठकीत दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग किटही आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.