सर्वसामान्यांची लालपरी झाली डिजिटल
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
राज्य परिवहन महामंडळातर्फे नवीन अद्यावत आरामदायी, तांत्रिकदृष्ट्या प्रगत डिजिटल बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूण 3 हजार नवीन बसेस थेट कंपनीकडून महामंडळाला उपलब्ध केल्या जाणार आहेत. रत्नागिरी विभागात अजूनही या बस दाखल झालेल्या नसून लवकरच बस दाखल झाल्यानंतर प्रवाशांना टीव्ही पाहत प्रवास करता येणार आहे.
टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागाला नवीन डिजिटल बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महामंडळाच्या उपलब्धतेनुसार रत्नागिरी विभागातही डिजिटल बसेस दाखल होणार आहेत. तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुन्या बसेसच्या वारंवार बिघाडाच्या तक्रारींमुळे आरामदायी व तांत्रिकदृष्ट्या प्रगत बसेस प्रवाशांसाठी धावणार आहेत. आतापर्यंत एसटी महामंडळ जुन्या पद्धतीने चेसिस घेऊन त्यावर बस बांधणी करत असे; मात्र, आता थेट कंपनीकडून संपूर्ण बस तयार करून ती महामंडळाकडे दिला जाणार आहे. त्याचबरोबर वाढत्या गर्दीमुळे त्यावर पर्याय म्हणून 3 बाय 2 आसन व्यवस्था या बससाठी तयार केली आहे. 15 वर्षानंतर 3 बाय 2 सीटची रचना असणार आहे. त्यामुळे अधिक प्रवासी बसू शकणार आहेत. या आसन व्यवस्थेसोबतच जाहिरातीसाठी एलईडीटीव्ही, डिजिटल चालक डिस्प्ले व प्रवासी माहिती फलक व्यवस्था देखील असणार आहे.
डिजिटल लालपरी
पूर्वीच्या पारंपरिक एसटी प्रवासाच्या तुलनेत ही नवीन लालपरी डिजिटल असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये सुसज्ज माहिती, संगीत, जाहिरातीचा अनुभव मिळणार आहे. तसेच, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळातर्फे विविध सवलती देण्यात येत असतानाच अद्यावत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशी संख्येत वाढ होणार आहे. त्याचबरोबर नवीन बसमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरसह इंजिन, एलईडी टीव्हीवर जाहीराती, संगणकावर बसमधील बिघाड समजणारी प्रणाली उपलब्ध असणार आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास डिजिटल होणार आहे.