| गुहागर | प्रतिनिधी |
स्कॉन उद्योग समुहातील रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो, स्कॉन प्रो फाऊंडेशन, शं.ना. चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारत विकास परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 100 दिव्यांग बांधवांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. तालुक्यातील चिखली ओमकार मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
स्कॉन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक नीलेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मार्च माहिन्यात दिव्यांग बांधवांचे शिबीर घेऊन त्यांना बसवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कृत्रिम अवयवांचे मोजमाप घेण्यात आले होते. या अवयवांचे वाटप दिव्यांग बांधवांना करण्यात आले. यावेळी प्रगत तंत्रज्ञानावर आधारित, जगभरातील प्रशंसित उपकरणे वापरुन बनवलेले आणि रुपये 50 हजार पेक्षा अधिक बाजार मूल्य असणारे कृत्रिम मोड्युलर पाय, हात व कॅलिपर दिव्यांग बांधवांना पूर्णपणे मोफत देण्यात आले.
यावेळी उद्योजक सतीश चव्हाण, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो.चे सेक्रेटरी राहुल पुरकर, रोटेरियन प्रकाश अण्णा, स्कॉनचे अधिकारी विनायक मुणगेकर, भारत विकास परिषदेचे अधिकारी वासुदेव कार्ला व इतर तंत्रज्ञ उपस्थित होते. हे दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी उभारी देणारे जीवनदायी पाऊल असून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा नवा किरण दाखवणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे.