शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची दादागिरी

कांदिवलीतील अभियंत्यांना खंडणीसाठी धमकी

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कांदिवली पश्‍चिमेला दादागिरी सुरू आहे. सत्तेचा माज आलेल्या त्या पदाधिकार्‍यांनी रस्त्याचे काम करणार्‍या अभियंत्यांना पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकावून त्यांना बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात मस्तवाल पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिव्हिल इंजिनीयर आशीष मल्हा (29) यांच्या तक्रारीवरून लालसिंग राजपुरोहित, गणेश पवार, पिंटो जयस्वाल, विकास गुप्ता, नीलेश जयस्वाल आणि सुरेश शहा या मस्तवाल पदाधिकार्‍यांविरोधात खंडणीसाठी धमकावून अभियंत्यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हा हे बी.एस.सी.पी. एल इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीत सिव्हिल इंजिनीयर म्हणून काम करतात. या कंपनीला कांदिवली येथील आर वॉर्डमधील रस्त्याच्या काँक्रिटायझेशनच्या कामाची वर्कऑर्डर मिळाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून इराणी वाडी रस्ता क्रमांक 3 येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लालसिंग राजपुरोहित, गणेश पवार या दोघांनी मिळून रस्त्याचे कामकाज सुरू ठेवण्याकरिता पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पण खंडणी दिली नाही म्हणून इराणी वाडी क्रमांक 3 येथील दत्तानी मार्गावर असलेल्या राजपुरोहित याच्या कार्यालयात बोलावून घेतले. पैसे देण्यास नकार देताच राजपुरोहित, गणेश पवार, पिंटो जयस्वाल व अन्य 10 ते 15 जणांनी मिळून मला व अभियंता विश्‍वनाथ चौरसिया, विनीत ओमप्रकाश सिंग यांना कार्यालयाबाहेर नेऊन शिवीगाळ करत बांबू तसेच लाथबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेथे खोदलेल्या खड्ड्यात ढकलले. अशा प्रकारे हे लोक वारंवार त्रास देत असल्याचे आशीष मल्हा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version