सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक विस्कळीत
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि.17) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात मिसिंग लिंकवर असलेल्या पुलावर तीन वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिसिंग लिंकच्या पुलावर बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त तिन्ही गाड्या मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. यातील फॉर्च्युन गाडी अचानकपणे मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पूलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंदाई कंपनीची वेरना कार वेगाने येऊन फॉर्च्युनर गाडीवर आदळली. यानंतर वेरना गाडीने आणखी एका कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, तिनही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र प्रवाशांंनी सीट बेल्ट लावले असल्याने आणि गाडीतील एअर बॅग्ज उघडल्याने, सर्वजण बचावले.
अपघाताची माहिती मिळताच, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हलवली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षित अंतर राखणे, अचानक ब्रेक न मारणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.







