उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. घरातून टीव्ही चोरीला गेल्याच्या एका साध्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात सराईत बंटी-बबलीसह चौघांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीकडून तब्बल 28 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

उरण शहरात एका घरातून टीव्ही चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत चार संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलीसी खाक्या दाखवताच संशयितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तपासात धक्कादायक माहिती समोर आली. ताब्यात घेतलेल्या चार संशयितांपैकी मुख्य सूत्रधार असलेल्या दोघांनी आतापर्यंत उरणसह नवी मुंबई आणि रायगड परिसरात तब्बल 28 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यातील तिसरा संशयित 6 घरफोडीत तर चौथ्या संशयित एका घरफोडीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या चौघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हाफ मर्डर, जबरी चोरी, घरफोडी सारखे तब्बल 35 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या टोळीमध्ये मोहित कोळी आणि त्याची मैत्रीण स्वप्नाली उर्फ सोनू पाटील या प्रियकर-प्रेयसीच्या जोडीचा समावेश आहे. या बंटी-बबलीच्या जोडीने उरण परिसरात अनेक बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्या होत्या. दिवसा बंद घरांची रेकी करायची आणि रात्रीच्या वेळी हात साफ करायचा अशी त्यांची पद्धत होती. चोरीतील मुद्देमाल विकून ते आपली हौस-मौज पूर्ण करत होते.

Exit mobile version