घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई, पाच गुन्हे उघड

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छडा लावला असून, नागोठणे परिसरातील पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नागोठणे परिसरातील शिवू, मुंढाणी आणि बेणसे या भागांत गेल्या तीन वर्षांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, सुधीर मोरे, अमोल हंबीर, शरद फरांदे, रणजीत खराडे तसेच पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे आणि प्रदीप खरात यांनी विविध माध्यमांतून तपास सुरू केला.

नागोठणे येथील एका गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार अमोल हंबीर आणि पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने ऑनलाईन रमी खेळात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने तो कर्जबाजारी झाल्याची कबुली दिली. कर्ज फेडण्यासाठी त्याने विविध ठिकाणी घरफोडी केल्याचेही त्याने मान्य केले. आदित्य अमृत कुथे (23), रा. मुंढाणी, ता. पेण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे त्याच्याकडून तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

Exit mobile version