गुन्हे शाखा कक्ष-3ची कारवाई; चौघे सराईत आरोपी ताब्यात
। पनवेल । प्रतिनिधी ।
रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीत नवी मुंबई, रायगड आणि ठाणे परिसरातील आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तळोजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. तळोजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. त्यानुसार सापळा रचून लहु पवार (40), सचिन पवार (22), अंकुश पवार (34) आणि शहाजी पवार (50) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये तळोजा, पनवेल तालुका, पनवेल शहर, खोपोली आणि कळवा पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तळोजा पोलीस ठाणे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, पनवेल शहर पोलीस ठाणे, खोपोली पोलीस ठाणे आणि कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण आठ गुन्ह्यांचा तपास या कारवाईत उघडकीस आला आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी त्यांना तळोजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
