धुतूममध्ये घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

। उरण । वार्ताहर ।
धुतूम गावातील रहिवासी सुभाष मोतीराम ठाकूर यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास घडली. ठाकूर हे घराला कुलूप लावून जेएनपीए बंदरातील वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या मुलीकडे सोमवारी गेले होते. मंगळवारी (दि.10) सुभाष ठाकूर हे घराकडे आले असता बंद घराच्या दरवाजाचे कुलूप, कपाट, तिजोरी तोडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. तसेच घरातील सामान विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले असता सुभाष ठाकूर यांनी सदर घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली.

उरण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असता घरातून अज्ञात चोरट्यांनी 12 तोळ्याचे मंगळसूत्र, 5 तोळ्यांची दोन मंगळसूत्रे, 4 अंगठ्या, कानातील दोन रिंगा, 50 हजारांची रोकड, 5 तोळे चांदी, टीव्ही संच (एलजी 42) असा लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. उरण पोलीस यंत्रणेने यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सीसीटिव्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version