70 हजारांचे सोन्याचांदीचे दागिने चोरीला
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या क्षितिज हॉस्पिटल परिसरातील गुरुकृपा सोसायटीमधील रहिवाशांच्या घराचे खिडकीचे लॅच तोडून चोरट्यांनी चोरी केली. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी त्या घरामधून 70 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
गणेश रामचंद्र परब यांचे नेरळ ममदापूर भागात गुरुकृपा सदन नावाचे घर आहे. त्या घरामध्ये 31 जानेवारीच्या मध्यरात्री ते एक फेब्रुवारीच्या पहाटे दोन वाजून 40 मिनिटे या कालावधीत चोरीची घटना घडली. घरातील खिडकीतून चोरट्यांनी लॅच तोडून घरात प्रवेश करून चोरी केली. ही घटना माहिती होताच गणेश परब यांनी नेरळ पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आल्यानंतर नेरळ पोलिसांनी रात्रीची गस्त ठेवत कल्याण ठाणेकडे जाणारे रस्त्यावर अनोळखी व्यक्तींची तपासणी केली. तसेच नेरळ रेल्वे स्टेशनवर थांबून आरोपी लोकल पकडून पसार होणार नाहीत याची काळजी घेतली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी सकाळी अलिबाग डॉग स्कोड बोलावून घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली. या चोरीच्या घटनेत 20 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या लहान मुलाच्या अंगठ्या यांची चोरी केली तसेच, 30 हजार रुपये किमतीचे महिलेच्या कानातील सोन्याचे रिंग आणि 20 हजार रुपये किमतीची चांदीची भांडी यांची चोरी चोरट्यांनी केली.
याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा 20/24 नुसार भादंवि कलम 454,457, 380 नुसार गुन्हा दाखल असून, त्या अज्ञात चोरट्याचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे. प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक सरगर अधिक तपास करीत आहेत.