सुदैवाने जिवीतहानी टळली; वाहतूक पोलीस साळुंखे यांची सतर्कता
| अलिबाग | प्रतिनिधी |
पुणेकडे जाणाऱ्या ब्रीजा गाडीने भर रस्त्यात पेट घेतला. कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस अमित साळुंखे यांनी सतर्कता दाखवत नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सलग चार दिवस सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पुण्याहून पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. सुट्टी संपल्यावर परतीच्या मार्गावर सायंकाळी पुणे येथील पर्यटक निघाले. त्यांची मारुती सुझूकी कंपनीची ब्रीजा ही चारचाकी घेऊन जात होते. चेंढरे बायपास जवळ आल्यावर अचानक गाडीने पेट घेतला. चालकासह गाडीत बसलेल्या पर्यटकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला. ही बाब त्याठिकाणी कर्तव्य बजावत असणारे वाहतूक पोलीस अमित साळुंखे यांच्या लक्षात आली. त्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ अलिबाग नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी आल्यावर त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर आग विझविण्यात अग्निशमन दलााला यश आले. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.
