| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कल्याण ज्वेलर्सच्या स्टोअरमधून दोन बुरखाधारी अनोळखी महिलांनी संगनमताने सोन्याची बांगडी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बुरखाधारी महिला कल्याण ज्वेलर्समध्ये सोन्याची बांगडी खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. त्यांनी स्टोअरमधील सेल्समनचे लक्ष विचलित करून संधी साधत 21.04 ग्रॅम वजनाची, अंदाजे 1 लाख 10 हजार रुपये किमतीची प्लेन सोन्याची बांगडी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी चंदनसिंग किशोरसिंग राठोड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन बुरखाधारी अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.







