प्रवाशांची गैरसोय, आर्थिक भुर्दंड
| उरण | वार्ताहर |
खोपटे-कोप्रोली रस्त्यावर गुरुवारी (दि.8) एनएमएमटी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात खोपटा गावातील निलेश म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आणि एनएमएमटी कर्मचार्यांना डांबून ठेवले होते. त्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील जुईनगर रेल्वेस्थानक ते उरणच्या कोप्रोली गावदरम्यानची एनएमएमटीची 34 क्रमांकाची बससेवा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराकडे ये-जा करणार्या चाकरमानी, नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
नवी मुंबई परिवहन सेवेची एनएमएमटीची बससेवा उरण तालुक्यातील कोप्रोली, वशेणी, पिरकोणसारख्या खेडेगावात धावत असल्याने आणि सदर बस सेवेचा प्रवास हा स्वस्त असल्याने ग्रामीण भागातील चाकरमानी, नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होत आहे. त्यामुळे उरण पुर्व भागातील अनेक नागरीक या बसने प्रवास करत असत. सध्या या बस बंद केल्यामुळे ऑटो रिक्षा चालक आणि ईको चालकांचे फावले असून, ग्राहकांशी अरेरावी सुरू झाली असल्याची प्रवाशांची ओरड सुरू झाली आहे. पूर्वी प्रवाशांना कोप्रोलीवरून थेट नवी मुंबईच्या जुईनगरपर्यंत जाता येत होते. मात्र, आत्ता नवघर फाटा किंवा टाऊनशिपपर्यंत इको किंवा ऑटोपर्यंत जाण्यासाठी 20-30 रूपये खर्च होत असल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. या मार्गावर दिवसभर 52 फेर्या आणि पाच हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे या परिसरातील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. तरी, एनएमएमटीची बससेवा सुरु करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.