। पुणे । प्रतिनिधी ।
भवानी पेठ परिसरात व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आर्थिक फसवणूक झाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रमजान अली साचे (44) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. रमजान यांना गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. यासाठी त्यांनी बँकेचे कर्जही घेतले होते. काही कारणास्तव रमजान यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याने 14 ऑक्टोबर रोजी रमजान यांनी त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, रमजान यांच्या पत्नीने 21 ऑक्टोबर रोजी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.