अलिबागमध्ये व्यावसायिकाने जीवन संपविले

कर्जबाजारी झाल्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील स्पेअर पार्ट्‌‍सच्या प्रसिद्ध व्यावसायिकाने स्वतःचे जीवन संपविले. कर्जबाजारी झाल्याने त्याने त्याच्या दुकानातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.31) दुपारी रायवाडीजवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश कुसाळकर (42) असे या मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हा मूळचा अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील रहिवासी आहे. सध्या चेंढरे येथे राहात होता. चेंढरेपासून काही अंतरावर रायवाडी परिसरात त्याचे गाड्यांच्या स्पेअर पार्ट्‌‍सचे दुकान आहे. एक नामवंत व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती होती. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत दुकानातील लाखोंचा ऐवज जळून गेल्याने त्यांची मोठी वित्तहानी झाली होती. या नुकसानीतून सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तरीदेखील कर्जाचे डोंगर त्यांच्या डोक्यावर होता. मंगळवारी (दि.31) दुपारी नेहमीप्रमाणे ते त्यांच्या दुकानात गेले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुकानात असताना कामगाराला जेवून येण्यास सांगितले. त्यावेळी ते एकटेच होते. दरम्यान, त्यांनी दुकानातील छताला दोरीने लटकवून गळफास घेतला. ही बाब दुकानाच्या बाजूला असलेल्या दिनेश गॅरेजमधील कामगाराच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ दिनेश यांना अलिबागमधील जिल्हा रुगणालयात बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून ते अगोदरच मृत झाल्याचे घोषित केले. कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version