खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

नवीन पनवेल येथील खांदा कॉलनी सेक्टर 14 मधील हॉरेझन स्कूल परिसरात एका खड्ड्यातील विहिरीत उंट पडल्याची घटना गुरुवारी (दि.5) सकाळी घडली. याबाबत प्रथमेश भुजबळ यांनी नवीन पनवेल अग्निशमन केंद्राच्या कंट्रोल रूमला माहिती दिली. सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे वाहन कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जमीन सपाटीवरील विहिरीमध्ये उंट पडल्याचे निदर्शनास आले. उंटाला बाहेर काढण्यासाठी हायड्रा आणि जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, तो पर्यंत उंटाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस पंचनाम्यातून मिळाली. मृत उंटाचा मालक करण रमेश शिंदे असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान उप अग्निशमन अधिकारी अतुल सपकाळ, प्रमुख अग्निशामक विमोचक विकास पालवे, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे तसेच एएसआय ढोबळे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version