| पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 60 वर्षांवरील नागरिकांना ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा लाभ देण्याकरिता सोमवारी (दि.9) आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी लाभार्थ्यांच्या नोंदणी सहित वैद्यकिय प्रमाणपत्रासाठी आरोग्य तपासणीची सुविधादेखील देण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्तांनी केले आहे.
ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार इतकी राहणार आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकार्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्यावतीने जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणीची सोयदेखील नाट्यगृहात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.