रंगतदार सामन्यात कॅनडा 12 धावांनी विजयी
। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या चुरशीच्या सामन्यात कॅनडाने उलटफेर केला आहे. कॅनडाने आयर्लंडवर 12 धावांनी विजय मिळवला आहे. कॅनडाने आयर्लंडला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. आयर्लंडने या धावांचा 19 व्या ओव्हरपर्यंत शानदार पाठलाग केला. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. आयर्लंडला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र जेर्मी गॉर्डन याने 17 धावांचा शानदार बचाव केला. आयर्लंडला अवघ्या 5 धावाच करता आल्या.
यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना 24 तासात दुसरा उलटफेर पाहायला मिळाला. यूएसएने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता कॅनडाने तुलनेत अनुभवी असलेल्या आयर्लंडला पराभवाची धुळ चारली आहे. आयर्लंडच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना 26 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर कॅनडाने ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे आयर्लंडची स्थिती 6 बाद 59 अशी झाली. मात्र, त्यानंतर जॉर्ज डॉकरेल आणि मार्क एडायेर या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत आयर्लंडला सामन्यात कायम ठेवले. त्यामुळे विजयाच्या आशा कायम राहिल्या.
आयर्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. जेर्मी गॉर्डन याने शेवटची ओव्हर टाकली. जेर्मीने दुसर्या बॉलवर मार्क एडायरला 34 धावांवर कॅच आऊट करत ही जोडी फोडली आणि कॅनडाचा विजय निश्चित केला. डॉकरेल आणि एडायेर या दोघांनी सातव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेर्मीने हुशारीने उर्वरित 4 बॉल टाकून कॅनडाला विजयी केले.







