कालवा सफाईचा शेतीला फटका

9

उन्हाळी भातलावणी लांबणीवर
लावणी, कापणी होणार 20 दिवस उशिरा

| माणगाव | सलीम शेख |
काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी 15 डिसेंबरला सोडण्यात येते. या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने उशिरा हाती घेतली होती. त्यातच अपुरी मशिनरी आल्याने कालव्याची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ व पुरेसी साधनसामुग्री मिळाली नसल्याने कालव्याची कामे झाल्या नंतर तब्बल 15 दिवसांनी कालव्याला उशिरा पाणी सोडल्याने ऐन रब्बी हंगामात दुष्काळात तेरावा महिना निघाल्याची भावना शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, यंदाच्या रब्बी हंगामाचे पीक पुरते धोक्यात येणार असून, उन्हाळी भातपिकाची लावणी व कापणी तब्बल 20 दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे यावर्षी भातपीक लावणीची कामे लांबवणीवर पडणार आहेत.

यापूर्वी या कालवा दुरुस्तीची कामे शासन ठेकेदारामार्फत करीत होते. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ही कामे पाटबंधारे विभागाकडून मशिनरीद्वारे केली जातात. त्यामुळे ती अर्धवट व थातूरमातूर करून कालव्याला पाणी सोडले जाते. याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून, भातकापणीला उशीर होणार आहे. दरम्यान, पाऊस वेळेत सुरु झाल्यास खरीप हंगामातील मशागतीची कामे करण्यास शेतकर्‍यांना पुरेसा वेळ मिळणार नाही. तर रब्बी हंगामातील पिक व भाताचा पेंढा भिजण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामावर अस्मानी संकट येणार आहे.

दरवर्षी 15 डिसेंबरपूर्वी कालवा सफाईची कामे पूर्ण करून मुदतीत पाणी सोडले जात असत. यावर्षी 31 डिसेंबरला पाणी सोडल्याने शेतकर्‍यांनी पेरणी काही ठिकाणी केली आहे. तर काही ठिकाणी पेरणी चालू आहे. तर काही ठिकाणी भाताची रोपे रुजली असून, ती 20 दिवसानंतर लागवडीलायक होणार आहेत. यंदा ही लागवड 20 दिवस पुढे जाणार असल्याने फेब्रुवारी महिन्यात लागवड होण्याची शेतकर्‍यांतून चर्चा असून, कापणीसाठी 20 मे उजाडणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांना भात मळणी व खरीप हंगामाची मशागत करण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

पाण्याचे नियोजन
डोलवहाळ बंधार्‍यातून कुंडलिका डावा तीर कालवा, माणगाव, मोर्बा व गोरेगाव या कालव्यातून पाणी सोडले जाते. या कालव्यातून माणगाव, गोरेगाव, मोर्बा या तीन शाखांच्या परिसरातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचन आदी संदर्भाने नव्या वाटा धुंडाळत आहेत. लहरी निसर्गाने शेती जुगार ठरत असताना, शाश्‍वत उत्पन्नाचे मार्ग अवलंबत आहेत.

उन्हाळी भातपीक हे नगदी व शाश्‍वत पीक म्हणून ओळखले जाते. औद्योगिकीकरणामुळे भातपिकाचे क्षेत्र घटत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने शेतकर्‍यांना योग्य साथ देत पाणी वेळेत सोडले तर शेतीचे नियोजन करणे सोयीस्कर होईल. – पंकज तांबे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष

Exit mobile version