कालवा सफाईच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला …

15 डिसेंबरला कालव्याला पाणी सुटणार !
। माणगाव । प्रतिनिधी ।
काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडण्यात येते; या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने नुकतीच हाती घेतली आहेत. ही कामे सध्या एका मशिनरीच्या सहाय्याने धरणाची वाडी परिसरातील कालव्यावर केली जात आहेत. दि.15 डिसेंबरला कालव्याला पाणी सुटणार असून रब्बी हंगाम कालवासफाईच्या कामाला पाटबंधारे विभागाला अखेर मुहूर्त सापडला असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात या कालव्याला मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ साठतो त्याच बरोबर शेवाळ व झाडे, झुडपे वाढली असून या कालव्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाला दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही नुकतीच हाती घेतली असून या कामाची गाडी धीम्याच गतीने सुरु असून सध्या ही कामे सुरु झाल्याने रब्बी हंगामातील शेतीला कालव्याचे पाणी मिळणार असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माणगाव तालुक्यातील मोर्बा शाखेवर क्यानल सायपण दुरुस्तीचे काम अद्यापही करणे बाकी आहे. तर उर्वरित कालव्यातील गाळ काढण्याची कामे हाती घेतल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चांगलाच रब्बी हंगामाच्या कामाला लागला असून रब्बी हंगामातील पिक घेण्यासाठी आपल्या शेताची मशागतीची कामे करण्यात मग्न झाला असून त्याची कामे करण्याची गाडी सुपरफास्ट धावत निघाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पंधरा डिसेंबरला कालव्याला पाणी सुटणार असल्याने त्याची चांगलीच पुरती धांदल उडाली आहे.


माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी भात पिक मोठ्या प्रमाणात घेतात व उर्वरीत शेतकरी कडधान्यांची पिके घेतात. कडधान्य पेरलेल्या शेतात पाणी गेल्यानंतर नुकसान होते. त्यामुळे कडधान्य पिकवणारे शेतकरी पाणी सोडण्यास नकार देतात. तर भातपीक घेणारे शेतकरी पाण्याची मागणी करतात. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागापुढे पेच उभारणार आहे. कालव्याच्या पुच्छ भागातील शेतकर्‍यांनी हळवी पिके तर ऊर्ध्व भागातील शेतकर्‍यांनी गर्वी पिके घेऊन शेतकर्‍यांनी शेतचार्‍याची निगा राखावी जेणेकरून सिंचन सुरळीत होईल असे आवाहन पाटबंधारे विभागाच्याच्या वतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version