रब्बी हंगामासाठी कालव्याचे पाणी शेतात

1200 हेक्टर जमिनीवर होणार पेरणी; शेतकरी लागला भात पेरणीच्या कामाला


| माणगाव | प्रतिनिधी |

काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षीप्रमाणे 15 दिवस उशिरा शेतात आले असून, शेतकरी आपल्या रब्बी हंगामाच्या भात पेरणीच्या कामाला लागला आहे. उशिरा का होईना पण यंदाचे वर्षीही कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने हाती घेतली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बळिराजा रब्बी हंगामातील भातपीक घेण्यासाठी मशागतीची कामे पूर्ण करून बी-बियाणे व खत खरेदी करून तयार होता. अखेर शेतात पाणी आल्याने शेतकऱ्याने आपली पेरणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान होत आहे. यंदाचे वर्षी 1200 हेक्टर वर भात पेरणी होणार आहे.

तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीक घेण्यासाठी शेतीची मशागतीची कामे करण्यात मग्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पंधरा डिसेंबरला कालव्याला पाणी सुटेल या डेडलाईनकडे शेतकऱ्याचे डोळे लागले होते. यांत्रिक विभागाकडून एकच मशीनरी उपलब्ध झाल्यानंतर कालव्याच्या सफाईचे काम संत गतीने झाले. अनेक ठिकाणी कालव्याची कामे करणे बाकी राहिल्याने तीही कामे केली जातील, अशी माहिती माणगाव पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्रीकांत महामुनी यांनी प्रतीनिधींशी बोलताना दिली.

…तर तालुका सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍ होईल
माणगाव तालुक्यात दुपिकी भातपीक शेतकरी घेतात. कालव्याच्या पाण्यावर शेकडो हेक्टर भातपीक घेतले जाते. रब्बी हंगामातील हे पीक शाश्वत असून, शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड करतो. यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घरी धान्य ठेवून उर्वरित धान्य बाजारात विकतो. त्यामुळे त्याचे आर्थिक उत्पन्न वाढते. त्याचबरोबर गुरांसाठी भाताचा पेंडा वैरण म्हणून त्याला मिळते. कालव्याची कामे शासनाने वेळीच हाती घेऊन माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आल्यास माणगाव तालुका सुजलाम सुफलाम्‌‍ होईल व माणगावच्या आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावेल.

विविध पिकांचे उत्पादन
सन 2018 मध्ये चार हजार नवशे त्रेपन हेक्टर सिंचनापैकी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी 1248 हेक्टर सिंचन झाले होते. यंदाचे वर्षी माणगाव शाखेवर 79.32 हेक्टर जमिनीवर तर मोर्बा शाखा 61.23 हेक्टर जमिनीवर सिंचन करण्यात आले होते. गोरेगाव शाखा कालवा गेल्या वर्षी गळतीमुळे बंद होता. धरणाचीवाडी ते माणगाव हे 30 कि.मी अंतर आहे.

Exit mobile version