आठ वर्षांपासून कालवे कोरडेच

पाताळगंगेतील शेकतकऱ्यांची शेतीकडे पाठ

| रसायनी | वार्ताहर |

गेल्या सात ते आठ वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतीपर्यंत पोहोचले नाही. शिवाय, कालव्याची दुरवस्था झाल्याने शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी भातलागवडीकडे पाठ फिरविली आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही, असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्याच्या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत कालव्याला पाणी येत असते. मात्र, खालापूर तालुक्यातील पाताळगंगा हद्दीतील माजगाव, आंबिवली, वारद, पौध तसेच या परिसरातील जोडणाऱ्या आदिवासीवाड्या असून, सन 2017 पासून कालवे कोरडे पडले आहे.

मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांना आश्वासनांपलीकडे काही मिळत नाही. कालव्याची दुरुस्ती झाली की काही महिन्यात पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दरवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र, तसे होतच नाही. एकीकडे सरकार म्हणते की, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, मात्र प्रत्यक्षात भातलागवडीसाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. सन 2017 मध्ये पाणी सोडले होते, मात्र ते शेवटपर्यंत पोहोचले नाही. यामुळे कालवा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी पोहोचवू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, सन 2018 ते 2023 या वर्षात कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही.

खरसुंडी बंधाऱ्यातून पाणी हे कालव्याला येत असते. मात्र, कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे हा प्रस्ताव आम्ही आठ महिन्यांपूर्वी पाठविला असून, अजून त्याची मंजुरी आलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा प्रस्ताव पाठविला जाईल.

भारत गुंटुरकर,
उपविभागीय अभियंता

पूर्वी कालव्याला पाणी येत असल्यामुळे दरवर्षी भातलागवड होत असे, शिवाय गुरांच्या पाण्याचा प्रश्न, विहिरीला पाणी राहात असे. मात्र, सात ते आठ वर्षांपासून पाणी बंद झाल्यामुळे भाताचा दाणा पहावयास मिळत नाही.

काशिनाथ जाधव,
शेतकरी, माजगाव
कालव्याची झालेली दुरवस्था
Exit mobile version