| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगर पालिका हद्दीतील खारघर सेक्टर 10 येथील निरसूख बार एण्ड रेस्टोरंट ला देण्यात आलेला परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी शासनाकडे केले आहे.
खारघर वसाहत ही पूर्वी पासून नो लिकर झोन(दारू मुक्ती) शहर ओळखले जात असून याच शहरामध्ये सेक्टर 10 येथील निरसूख बार एण्ड रेस्टोरंट ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने खारघर वसाहत परिसरात आणखी मोठ्या प्रमाणात बार, तसेच आगामी काळात लेडीज बार सुद्धा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नो लिकर झोन (दारू मुक्ती) शहर या संकल्पनेला तडा जाण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारच्या परवानग्यांमुळे येथील रहिवासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत.
हा परिसर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखला जातो. सन 2007 साली सेक्टर 20 येथे जलवायू सोसायटी शेजारी श्याम वाईन्स सुरु करण्यात आला होता. त्याला येथील रहिवासीयांनी, विविध संघटना, संस्था शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन मोर्चे व आंदोलने उभारून प्रखर विरोध केला होता. नागरिकांचा वाढता रोष पाहून रायगड जिल्हा उत्पादन शुल्क या विभागास हे दुकान बंद करावे लागले होते. असे असतानाही निरसूख बार एण्ड रेस्टोरंट ला परवाना देण्यात आल्याने येथील रहिवासीयांनी संताप व्यक्त केला असून, या बार विरोधात शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल व शासनाला हा बार बंद करण्यास भाग पाडेल, असा इशारा शिवसेना खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी दिला आहे.