जोत्यावरील घरपट्टी रद्द, पण बांधकामाचं काय?

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या नियोजित जागेत अनधिकृत जोत्याचे बांधकाम असताना त्यावर नेरळ ग्रामपंचायतीने घरपट्टीची आकारणी केली होती. तर, याबाबत ग्रामस्थ संदीप म्हसकर यांनी हरकत घेतल्यावर संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे घराचे बांधकाम नसल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आले. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने संबंधित वादातीत जोत्यावरील घरपट्टी रद्दची कारवाई केली आहे. मात्र, जोत्याचे बांधकाम प्राधिकरणाच्या जागेत जैसे थे आहे, त्याच पुढे काय, असा प्रश्‍न अनुत्तरित राहिला आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी येथे प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध असा डेव्हलपमेंट आराखडा आखण्यात आला आहे. 40 फूट डिपी रस्ता तयार करून यामध्ये भविष्याचा दूरदृष्टीकोन ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रासाठी जागा देखील प्राधिकरणाने आरक्षित केलेली आहे. परंतु, ज्या नकाशात प्राधिकरणाने रस्ता अधोरेखित केला त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. नेरळ येथील शिवाजी पार्क नेरळ या मार्गात एक सिमेंटने पक्का स्वरूपात घराचा जोता अनधिकृतपणे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी घर उभारणी केली जात होती. मात्र, हे अनधिकृत बांधकाम सुरु असताना ते थांबवण्याची प्रक्रिया करण्याऐवजी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावर घरपट्टी आकारणी केल्याचा प्रकार घडला होता.

14 ऑक्टोबर 2020 रोजी सुनंदा रवींद्र पोपेटे रा. मोहचीवाडी यांनी आपण सर्वे नं 253 मधील अर्धा गुंठे जागा विकत घेतली असून, त्यावर घरपट्टी आकारणी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी त्यावर 7/12 उतारा व मोजणी नकाशा आणल्याशिवाय अर्ज मासिक सभेवर असा शेरा अर्जावर टाकण्यात आला आहे. तर त्यानंतर अर्ज मासिक सभेवर घेऊन अर्जावर घरपट्टी आकारण्यात आली, मात्र पोपेटे यांनी काही मालकीचे कागदपत्र सादर केले नाही. तर पोपटे हे बांधकाम करत असलेली जागा हि नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या 40 फुटी डिपी रोडच्या अखत्यारीत येते तर हे बांधकामाच मुळात अनधिकृत आहे. त्यामुळे नेरळ येथील ग्रामस्थ संदीप म्हसकर यांनी यावर आक्षेप घेतला. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीला त्यांनी तक्रार केल्यावर नेरळ ग्रामपंचायतीने पोपेटे यांना आता नोटीस काढली होती. त्यावर आपण मालकी हक्काचे कागदपत्र अद्याप सादर केले नाहीत. तर मालकी हक्काचे कागदपत्र नसताना जोत्याचे बांधकाम करून त्यावर घरपट्टी लावून घेतली आहे. तर 40 फुटी डिपी रोडमध्ये आपण अतिक्रमण केले आहे. तसेच सादर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता कोणतेही स्ट्रक्चर नाही. तेव्हा आपण 2 दिवसात 7/12 घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा अन्यथा घरपट्टी रद्द केली जाईल अशी नोटीस नेरळ ग्रामपंचायतकडून पोपेटे यांना बजावण्यात आली होती.

दरम्यान, दि. 7 फेब्रुवारी रोजी नेरळ ग्रामपंचायतीने यावर कारवाई करत घरपट्टी रद्द केली आहे. मात्र, बांधलेला जोता हा प्राधिकरणाच्या रस्त्यात आजही ठाण मांडून आहे. तेव्हा हे अनधिकृत असलेलं बांधकाम पोपेटे यांना ग्रामपंचायतने लेखी काढायला सांगितलेलं नाही, त्यामुळे हे बांधकाम ग्रामपंचायत स्वतः काढणार की पुन्हा याला घरपट्टी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर याबाबत नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन याबाबत नक्की काय भूमिका घेणार हे समजू शकलेले नाही.

सुरुवातीला अतिक्रमण होताना ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही. मात्र, मी तक्रार केल्यावर संबंधित पोपेटे यांच्या प्राधिकरणाच्या रस्त्यात असलेल्या अनधिकृत घरावरील घरपट्टी रद्द केली आहे. मात्र, जोत्याचे बांधकाम तसेच आहे, ते कोण काढणार हा प्रश्‍न आहे? तेव्हा हे बांधकाम अनधिकृत असल्याने ते काढले जावे अशी माझी मागणी आहे.

संदीप म्हसकर, ग्रामस्थ नेरळ
Exit mobile version