शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे संकेत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने संघटनात्मक हालचालींना वेग दिला असून, महाविकास आघाडी जो निर्णय घेईल, त्यानुसार उमेदवार उभा केला जाईल, असे स्पष्ट संकेत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिले. कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची तयारी करून ताकदीने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, या निवडणुकीत शेकापच्या मतदारांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील शेकाप भवन येथे गुरुवारी (दि. 28) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीला माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण घरत, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, उरणच्या नंदा म्हात्रे, पनवेलचे अरविंद म्हात्रे, खालापूरच्या शिवानी जंगम, उरणचे सभापती महेश म्हात्रे, साक्षी पाटील, अश्विनी ठोसर, ॲड. निवेदिता वाघमारे, शैला भगत, सागर भगत, अनिल चोपडा, ॲड. निलम हजारे, सुषमा पाटील, खालापूरचे शेकाप नेते संतोष जंगम तसेच ॲड. परेश देशमुख यांच्यासह पनवेल, उरण, खालापूर, अलिबाग, खोपोली आदी भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शेकापचे पदाधिकारी, नगरसेवक आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांचे एक हजारहून अधिक मतदार असून, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्यानुसार उमेदवार निश्चित केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकरी कामगार पक्षाची भूमिका निर्णायक असेल. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहात मोठ्या ताकदीने मैदानात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, बैठकीनंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संवाद साधून निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
