पेझारीत शेकापकडून कँडल मार्च

पेपरफुटीच्या धक्क्याने जीवन संपवलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पेपरफुटीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून जीवन संपवलेल्या 21 विद्यार्थ्यांच्या स्मृतींना पेझारी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या खारेपाट विभागाच्यावतीने कँडल मार्च काढून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे,” असा सूर यावेळी उपस्थितांमध्ये उमटला.

पेझारी चेक पोस्टपासून शेकाप कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या कँडल मार्चमध्ये विद्यार्थी, पालक, तरुण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. हातात प्रज्ज्वलित मेणबत्त्या घेऊन विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या.

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी प्रदीर्घ काळ आंदोलन सुरू होते. या संघर्षादरम्यान जीवन गमावलेल्या 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेकापच्या वतीने हा कँडल मार्च आयोजित करण्यात आला.

शेकाप महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मार्चमध्ये शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, अलिबाग तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य विलास म्हात्रे, पेझारी-शहापूर विभाग महिला आघाडी प्रमुख ॲड. पूजा भगत, मो.रा. म्हात्रे, बाळाराम दांडेकर, प्रणित म्हात्रे, अंबरनाथ पाटील, प्रताप पाटील, भैरवी पाटील, तन्वी पाटील, श्रेया केळकर, अनिता काकडे, दिनेश पाटील, तेजस म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, प्रमोद राऊत, महेंद्र पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शेकाप कार्यालयाजवळ कँडल मार्चची सांगता झाल्यानंतर उपस्थितांनी 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ॲड. मानसी म्हात्रे आणि अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Exit mobile version