। सुकेळी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. अनेक वर्षे उलटुनही महामार्गाचे काम हे पुर्णत्वास गेले नाही. या अपुर्ण कामांमुळे महामार्गावर अपघातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असतांनाच गुरुवारी (दि.23) सकाळी 8 वाजता महामार्गावरील साईडपट्ट्यांच्या अपुर्ण कामांमुळे स्विफ्ट कार साईडपट्टीवरुन खाली उतरुन हा अपघात झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकण बाजुकडुन कोलाडच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार गोडसई गावाच्या पुढे आली असता एका रिक्षाला ओव्हरटेक करत असतानाच कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी साईडपट्टी सोडुन खाली उतरली. साईडपट्टीवर भराव नसल्यामुळे गाडी खड्ड्यात अडकली. दरम्यान, महामार्गावरुन प्रवास करणार्या अनेक वाहनचालकांनी थांबुन ही कार रस्त्यावर काढण्यास मदत करीत माणुसकीचे दर्शन घडविल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.