कारची दुचाकींना धडक; तीन जखमी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव-पुणे रस्त्यावरील वळणावर दोन दुचाकींना कारची धडक लागून झालेल्या अपघातात तीन जखमी झाले. सदरील अपघात दि.30 सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास सणसवाडी गावच्या हद्दीत घडला. या अपघाताची फिर्याद गोविंद विष्णुदास मुदडा (30) सध्या रा. धनकवडी, पुणे, मूळ रा. पुसेगाव, जि. हिंगोली यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यांतील फिर्यादी गोविंद विष्णुदास मुदडा व त्याचा मित्र रायगड किल्ला फिरून परत निजामपूर ताम्हिणी घाटमार्गे पुण्याकडे जात असताना, सणसवाडी गावच्या हद्दीत टी पॉईंटच्या पुढे वळणावर फिर्यादीचा मित्र श्रावण सांगळे हा चालवीत असलेली स्कुटी क्रमांक एम.एच.12/यूआर/8256 या गाडीला व फिर्यादीच्या ताब्यातील शाईन मोटारसायकल क्रमांक एम.एच.12/टी.झेड/7356 या गाडीला पुणे बाजूकडून येणारी कार क्रमांक एम.एच.14/जी. वाय/8708 या गाडीवरील चालक आकाश दत्तात्रय कुलकर्णी (27) रा. पिंपळे सौंदागर पुणे, याने वळणावर भरधाव वेगात विरुद्ध दिशेला येऊन धडक दिली.

या अपघातात फिर्यादी गोविंद मुदडा, उद्धव शिंदे (29) रा. पिंपळे सौंदागर पुणे, श्रावण सांगळे (30) रा. माणिकबाग पुणे हे तीन जण जखमी होऊन वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. तुणतुणे हे करीत आहेत.

Exit mobile version