। माणगाव । प्रतिनिधी ।
पुणे- माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात एक कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतील काही प्रवाशांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू आहे. एक थार गाडी ताम्हिणी घाटातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम सुरू केली. घटनास्थळावरून पोलिसांना तीन मृतदेह सापडले आहेत. माणगाव पोलिसांचे बचाव पथक इतर प्रवाशांचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाट वर्दळीचा रस्ता आहे. या घाटातून नेहमीच गाड्यांची ये- जा सुरु असते. या घटातील तीव्र वळणं फार धोकादायक आहेत. या घाटात बरेच अपघात यापूर्वी झाले आहेत. अशातच पुणे- माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात एक थार 500 फूट दरीत कोसळली आहे. इतक्या खोलवर गाडी कोसळल्याने गाडीतील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तीन तरुणांपैकी आणखी काही जण या गाडीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवघड वळणावर चालकाचा नियत्रंण सुटल्याने थार कार 500 फूट दरीत कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. शिवाय बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, हा अपघात केव्हा झाला ? या बद्दल नेमकी माहिती नाही. मात्र, ड्रोन शुटमध्ये दरीत थार कार आणि मृतदेह आढल्याने बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून, मृतदेह बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.





