कारची मोटारसायकलला धडक; चार जण जखमी

। रसायनी । प्रतिनिधी ।

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पराडे कॉर्नर येथे अज्ञात कारचालकाने मोटारसायकलला धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली. या अपघातात मोटारसायकलवरील कुटुंबातील चार जण जखमी झाले असून, मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित कारचालकाने अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 14) रात्रीच्या कालावधीत मौजे पराडे कॉर्नर, रसायनी येथे ही घटना घडली. सफेद रंगाच्या कारवरील अज्ञात चालकाने वाहन अतिवेगाने, हयगयीने व बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. यावेळी कारने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तक्रारदारास किरकोळ दुखापत झाली असून, त्यांची पत्नी अक्षता मुंढे यांच्याश दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर अज्ञात कारचालकाने जखमींना मदत न करता तसेच अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून कारसह पलायन केले. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अधिक पोलीस हवालदार पानपाटील करीत आहेत. फरार कारचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Exit mobile version